गुरुजनांच्या सन्मानाने उजळला शिक्षक दिन!
नांदोरे : शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा ज्ञानदीप आणि मार्गदर्शक दीपस्तंभ होय. याच गुरुजनांप्रती कृतज्ञता, आदर आणि प्रेम व्यक्त करत एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात प्रशालेतील सर्व शिक्षकांचा मान-सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेला आदर आणि ऋण व्यक्त करत हा सोहळा संस्मरणीय केला.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक कुणाल निंबाळकर, स्टेट कॅम्पस विभाग प्रमुख साईनाथ कुंभार, सीबीएसई कॅम्पस प्रमुख सचिन डोके, फाउंडेशन विभाग प्रमुख विकास तिवारी, दहावी विभाग प्रमुख माऊली मोकळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतली आयोजनाची धुरा
या शिक्षक दिन कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने कार्यक्रमाचे नियोजन करून आपल्या शिक्षकांसाठी विविध विशेष उपक्रम राबविले. गुरुजनांचा सन्मान करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शिक्षकांच्या मनातील समाधान असे भावनिक वातावरण संपूर्ण कार्यक्रमात अनुभवायला मिळाले.
“गुरुजनांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा सन्मान”
या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शिक्षक-विद्यार्थी नात्यातील जिव्हाळा आणि आपुलकी अधिक दृढ करणारा ठरला.
शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, विचारांना आणि व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळते. त्यामुळे शिक्षक दिनाचा हा सोहळा केवळ औपचारिक न राहता गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला.
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच संस्कार, कृतज्ञता आणि गुरुजनांविषयी आदराची भावना रुजविणाऱ्या या उपक्रमातून एस. पी. पब्लिक स्कूलच्या संस्कारक्षम शैक्षणिक वातावरणाचे सुंदर दर्शन घडले.



Post a Comment
0 Comments