सोलापुरात अनोखे आंदोलन!
सोलापूर : मुलांच्या तुलनेत मुलींचे घटते प्रमाण, बदलत्या सामाजिक-आर्थिक अपेक्षा आणि विवाह जुळविताना येणाऱ्या अडचणींमुळे अनेक तरुणांसमोर लग्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरातील काही लग्नाळू तरुणांनी अनोखे आंदोलन छेडले.
डोक्यावर बाशिंग, अंगात नवरदेवाचा पोशाख आणि हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन हे तरुण जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. “आम्हाला मुलगी मिळवून द्या, लग्न जमवून द्या!” अशा घोषणा देत त्यांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या.
आंदोलकांच्या मते, शेती आणि नोकरीत स्थिर असतानाही विवाहासाठी योग्य स्थळ मिळणे कठीण झाले आहे. लिंगगुणोत्तरातील असमतोल, विवाहाबाबतच्या वाढत्या अपेक्षा आणि सामाजिक परिस्थिती यामुळे अनेक सुशिक्षित व कष्टकरी तरुण विवाहापासून वंचित राहत आहेत. या समस्येकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहून योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
नवरदेवाच्या वेशातील तरुणांचे हे आंदोलन रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरले. काहींनी त्याची खिल्ली उडवली, तर अनेकांनी या आंदोलनामागील सामाजिक वास्तव समजून घेत तरुणांच्या व्यथेला पाठिंबा दर्शवला. या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या सोशल मीडियावरही रंगली आहे.

Post a Comment
0 Comments