Type Here to Get Search Results !

रेल्वे प्रशासनाची तातडीने दखल; पालखी मार्ग, सूर्वे वस्ती रेल्वे पूल अन् उमा विद्यालयाच्या बोगद्याची संयुक्त पाहणी!


 

मनसे जिल्हाध्यक्षांच्या निवेदनानंतर रेल्वे अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट; पाहणीअंती एस्टिमेट तयार करण्याचे आश्वासन

मोडनिंब, 

दिनांक : १९/०९/२०२६

पालखी मार्ग तसेच सूर्वे वस्ती भागात जाणाऱ्या रेल्वेच्या पुलाची (बॉक्स) रुंदी व उंची कमी असल्याने या मार्गावरून एसटी बस आणि मोठ्या वाहनांची वाहतूक करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तसेच 'श्री उमा विद्यालय' येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बोगदा मंजूर करावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी रेल्वे विभागाच्या जनरल मॅनेजर (GM) यांना दिले होते. या निवेदनाची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली.

रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अधिकारी श्री. भोसले साहेब यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. या पाहणीदरम्यान त्यांनी मनसे जिल्हाध्यक्षांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संयुक्तपणे परिसराची पाहणी केली.

नकाशा, मापे अन् अहवालावर चर्चा!


पाहणी दरम्यान दोन्ही रेल्वे पुलांची आणि रस्त्यांची उंची व रुंदी वाढवणे किती गरजेचे आहे, हे प्रत्यक्ष निदर्शनास आल्याचे रेल्वे अधिकारी श्री. भोसले यांनी सांगितले. ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी पुलाच्या विस्तारीकरणाचे आणि नवीन बोगद्याचे एस्टिमेट (अंदाजपत्रक) तयार करण्यासाठी आवश्यक मापे आज संयुक्तपणे घेण्यात आली.

"वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही या भागाची पाहणी करण्यासाठी आलो असून, दोन्ही पुलांची रुंदी-उंची वाढवणे व रस्ता करणे अत्यंत आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे लवकरात लवकर सादर करून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, ज्यामुळे स्थानिक नागरिकांची अडचण कायमची दूर होईल."

— श्री. भोसले (रेल्वे अधिकारी)

रेल्वे प्रशासनाने मनसेच्या निवेदनावर तत्परता दाखवत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक पाऊल उचलल्याबद्दल मनसे जिल्हाध्यक्ष व स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाचे मनापासून धन्यवाद मानले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments