अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निर्देश; सोलापूर जिल्हा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत निर्णय
सोलापूर:
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना त्वरित आणि विनाअडथळा उपचार मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील समाविष्ट रुग्णालयांची आजारनिहाय यादी तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी दिले आहेत. पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष व तक्रार निवारण समितीचे अशासकीय सदस्य हनुमंत कुंभार (गुरुजी) यांनी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली ‘महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संनियंत्रण आणि तक्रार निवारण समिती’ची बैठक पार पडली. या बैठकीत योजनेचा लाभ घेताना रुग्णांना येणाऱ्या अडचणी, प्रलंबित बिले आणि आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड वितरणातील संथ गती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी गावोगावी शिबिरे भरवणार
बैठकीत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याच्या ध्येयाबाबत कुंभार गुरुजी यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडले. त्यांनी स्पष्ट केले की:
वय वंदना कार्ड (७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी): यासाठी केवळ आधार कार्ड, मोबाईल नंबर व संबंधित व्यक्तीची उपस्थिती आवश्यक आहे.
गोल्डन कार्ड (७० वर्षांच्या आतील नागरिकांसाठी): यासाठी आधार कार्ड आणि ऑनलाइन रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यात अनेक नागरिकांचे रेशन कार्ड ऑनलाइन नसल्यानेच कार्ड वितरणाची टक्केवारी कमी असल्याचे कुंभार गुरुजी यांनी निदर्शनास आणून दिले. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील तहसीलदारांनी गावोगावी विशेष शिबिरे आयोजित करून रेशन कार्ड ऑनलाइन करून द्यावेत, ही त्यांची मागणी अध्यक्षांनी मान्य केली.
जिल्ह्यात १३३ रुग्णालये; २,३९९ आजारांवर मोफत उपचार
या बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत १३३ रुग्णालये (शासकीय व खाजगी) समाविष्ट असून, एकूण २,३९९ आजारांवर मोफत उपचारांची सोय उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त:
शासकीय व खाजगी रुग्णालयांना शासनाकडून मिळणाऱ्या थकीत बिलांवर चर्चा झाली.
कर्नाटक सीमावर्ती भागातील रुग्णांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे ठरले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, योजनेचे समन्वयक डॉ. प्रवीण गुंजाळ, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी जयकुमार काटवे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments