संपादक -प्रा.सदानंद बनसोडे.
भोसे (विशेष प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने भोसे येथील यशवंत सभागृहात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास भोसेसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद घेतला.
कार्यक्रमात प्रेम अवतार निमाय प्रभू तसेच भोसेचे सरपंच श्री. गणेशदादा पाटील व सौ. रश्मीताई पाटील यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाचा विधिवत महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्रीमान भगवान प्रभू यांचे आध्यात्मिक प्रवचन झाले. त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थित भाविकांना भक्ती, संस्कार आणि अध्यात्माचा संदेश मिळाला.
महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते मंगळवेढा येथील भक्तगणांनी सादर केलेले ‘श्री संत दामाजी पंत’ यांच्या जीवनपटावर आधारित नाट्यप्रयोग. प्रभावी अभिनय आणि भक्तिरसपूर्ण सादरीकरणामुळे या नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली. तसेच नमन्या इंगळे हिने सादर केलेल्या मनमोहक नृत्याने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनुर्धर अर्जुन प्रभू यांनी अभ्यासपूर्ण आणि बहारदार शैलीत केले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची सांगता महाप्रसाद वितरणाने झाली.
श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने आणि भक्तिरसाने भारलेल्या या जन्माष्टमी महोत्सवाला भोसे व परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

.jpg)
.jpg)
.jpg)
Post a Comment
0 Comments