Type Here to Get Search Results !

श्रीपूरमध्ये शहीद निवृत्ती जाधव यांच्या स्मृतिदिनी देशभक्तीचा जागर




भव्य रॅली, स्मारकावर अभिवादन, वृक्षारोपण अन् अभ्यासिका केंद्राचे भूमिपूजन; दोन मान्यवरांना ‘स्मृती गौरव पुरस्कार’

श्रीपूर प्रतिनिधी : श्रीपूर, ता. माळशिरस येथे शहीद पोलीस निरीक्षक निवृत्ती जाधव (सीआरपीएफ) यांच्या सोळाव्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक आणि देशभक्तीपर उपक्रमांनी परिसर भारावून गेला. वीरपत्नी सुरेखा जाधव यांनी उभारलेल्या शहीद निवृत्ती जाधव स्मारकस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भव्य रॅली, शहीद जवानाला अभिवादन, वृक्षारोपण, अभ्यासिका केंद्राचे भूमिपूजन आणि ‘शहीद निवृत्ती जाधव स्मृती गौरव पुरस्कार’ वितरणाने स्मृतिदिनाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.

शहीद निवृत्ती जाधव हे ४ ऑक्टोबर २०१० रोजी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना वीरमरण पावले. त्यांच्या शौर्याची आणि देशसेवेची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने दरवर्षी स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात.

स्मृतिदिनानिमित्त सकाळी ग्रामस्थ, आरएसपी विद्यार्थी, कब-बुलबुल पथक तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने शहीद जवान ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर शहीद निवृत्ती जाधव यांच्या प्रतिमेची श्रीपूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेत शहीद जवानाच्या स्मृतींना अभिवादन केले.

४ ऑक्टोबर रोजी स्मारकस्थळी मान्यवरांच्या हस्ते शहीद निवृत्ती जाधव यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शहीद जवानाला सलामी देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या शौर्याचे आणि देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून उपस्थितांनी युवकांनी त्यांच्या कार्यातून देशसेवेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

स्मारक परिसरात विकासकामांना चालना

जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैय्या बबनराव शिंदे यांच्या शुभहस्ते स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ३० लाख रुपयांच्या निधीतून शहीद निवृत्ती जाधव स्मारक परिसरातील विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. याच विकासकामांतर्गत शहीद निवृत्ती जाधव अभ्यासिका केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी PI नीरज उबाळे, PSI करिष्मा वनवे, वीरपत्नी सुरेखा निवृत्ती जाधव, मंडल अधिकारी शरद खंडागळे, प्राचार्य पांडुरंग बनसोडे आणि औदुंबर कदम यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

कर्तृत्वाचा गौरव

पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वनवे, तर महसूल विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाळुंगचे मंडल अधिकारी शरद खंडागळे यांना ‘शहीद निवृत्ती जाधव स्मृती गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास गटनेते राहुल रेडे, उपनगराध्यक्ष तानाजी भगत, नगरसेविका तेजश्री विक्रम लाटे, नगरसेवक प्रकाश नवगिरे, नगरसेवक सोमनाथ मुंडफने, ब्रीमा सागरचे नरेश पाठक, कॅप्टन लक्ष्मण माने, सुभेदार चांगदेव मोहिते, सीआरपीएफ पोलीस उपनिरीक्षक मुजाहिदूर रहमान यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य पांडुरंग बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शंकर यादव, उपमुख्याध्यापक सुनील गवळी, सिताराम गुरव, शेंडे सर, हनुमंत मोरे आणि केचे सर यांनी सहकार्य केले. शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यासह रवींद्र नाईकनवरे, भागवत पारसे, सुनील पताळे, सविता नाईकनवरे, सारिका नाईकनवरे, स्वाती पारसे, धर्मेश जाधव, प्रेरणा जाधव आणि अनुराग नाईकनवरे यांनीही योगदान दिले.

श्री चंद्रशेखर विद्यालय, नारायण काकाचे कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा, शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान तसेच बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता नाईकनवरे यांनी केले.


Post a Comment

0 Comments