दत्तनगर येथील गणेश मंदिराशेजारील मैदानात आगीचा भडका; धुराचे लोट पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
मोडनिंब प्रतिनिधी: किशोर ओहोळ.
मोडनिंब शहरातील दत्तनगर भागातील गणेश मंदिराशेजारील मैदानात गेल्या चार-पाच वर्षांपासून पडून असलेल्या जलजीवन मिशनच्या काळ्या पाण्याच्या पाईपांना आज दुपारी अचानक भीषण आग लागली. आगीने काही क्षणांतच मोठा भडका घेतल्याने परिसरात धुराचे प्रचंड लोट उठले. त्यामुळे मंदिर परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशन अंतर्गत आणण्यात आलेले मोठ्या प्रमाणातील पाईप या मैदानात अनेक वर्षांपासून पडून असल्याचे नागरिकांनी सांगितले. आज अचानक या पाईपांना आग लागल्याची घटना घडली. आगीची तीव्रता वाढताच मंदिर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच विठ्ठलराव शिंदे अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तसेच मोडनिंब शहरातील नागरिकांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले.
या आगीत जलजीवन मिशनच्या मोठ्या प्रमाणातील पाईपांचे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार पाच ते सहा ट्रक भरतील एवढ्या पाईपांचा साठा जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतील लाखो रुपयांचे साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या घटनेची चौकशी करून पाईपांचा एवढा मोठा साठा चार-पाच वर्षे मैदानात का पडून होता आणि आगीमुळे नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याचा तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
आगीच्या घटनेमुळे जलजीवन मिशनच्या साहित्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments